डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख जयंती

शिक्षित, जातीविरहित व समताधिष्ठित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांनी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी वाहिले. शिक्षण व कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्यासोबतच तळागाळातील लोकांच्या विकासासाठी भारतीय संविधानात उपाययोजना रुजवण्यात आणि सत्यशोधकी, पुरोगामी विचार समाजात पेरण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

संविधान सभेतील शेवटच्या भाषणात त्यांनी प्रौढ मताधिकारातून आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाची गरज अधोरेखित करत, जात-वर्ग-लिंगाधारित वर्चस्व संपुष्टात आल्याशिवाय संविधान यशस्वी होणार नाही, असे स्पष्ट केले. भाऊसाहेबांचे हे स्वप्न भारतीय संविधानात साकार झाले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा व संविधानिक मूल्यांचा प्रसार करूया!