मार्च मधील उपक्रम

महिलांचा करा सन्मान, सांगतय आपलं संविधान

8 मार्च 2025

तुम्हाला 8 मार्च – जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि भारतीय संविधानालाही 75 वर्ष पूर्ण झाली. भारतातील महिलांना सर्वप्रथम हक्क प्रदान केले ते भारतीय संविधानाने ! पण संविधानाला निहीत असलेली स्त्री-पुरुष समानता येण्यासाठीचा लढा अजूनही चालूच आहे.

चला, संविधानाचा जागर करूया, संविधानाने सांगितल्याप्रमाणे महिलांचा सन्मान करूया, महिलांचे हक्क आणि अधिकार सर्वांपर्यंत पोहचवुया!

महिला दिनानिमित्त उपक्रमांचे प्रस्ताव:

1. संघर्षातून उभ्या राहिलेल्या – विधवा किंवा एकल महिला, प्रतिकूल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या, घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात लढलेल्या, कर्मचारी युनियनचे काम करणाऱ्या, समाजाने आखून दिलेल्या चूल व मूल ह्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे. त्यासाठी लागणारे सन्मानपत्रक, महिला व संविधान या पत्रकाची PDF पुढे पाठवत आहे.

2. प्रेरणादायी महिलांचे पोस्टर वॉट्स अप वर स्टेटस ठेवणे. (8 मार्च निमित्त हे पोस्टर वॉट्स अप वर पाठवले जाईल).

3. महिला सन्मान शपथ: आपण आपल्या सोसायटी/मोहल्ला/वस्ती मध्ये लोकांना गोळा करून शपथ देऊ शकतो. आपण जिथे काम करतो, मित्रांमध्ये शपत देऊ शकतो. तसेच शाळांमध्ये/कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देऊ शकतो. सोबत पत्रकं वाटू शकतो.

वरील उपक्रमांसाठी लागणारे साहित्य खाली दिले आहे.

ईद निमित्त बंधुतेचा गोडवा पसरवूया

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हे भारतीय संविधानाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचे जतन करणे आणि बंधुभाव जोपासणे हे भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये नमूद केले आहे.

आपले सण आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. जेव्हा आपण सर्व मिळूण सण साजरे करतो तेव्हा विविध समाजघटकातील लोकांचा एकमेकांशी सामाजिक संवाद विकसित होण्यास मदत होते. आम्ही हे मानतो की, सगळे सण उत्सव सगळ्यांचेच आहेत, मग ती दिवाळी असो, ईद असो, ख्रिसमस असो, गुरुनानक जयंती, बुद्धपौर्णीमा किंवा अजुन कोणताही सण.

म्हणूनच ते सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सणांमध्ये कधी द्वेष नसतं, प्रेमच प्रेम असतं. संविधानामध्ये असलेला एकोपा जपण्यासाठी चला, आपण सर्व सण व उत्सव एकत्र साजरे करूया. येत्या महिन्यात ईद येत आहे. त्यासाठी पुढील प्रस्ताव:

1. रोजा ठेवत असलेल्या तुमच्या एक (किंवा अधिक) मित्र/मैत्रीणला एक दिवस इफ्तारला (उपास सोडण्यासाठी) घरी बोलावा.

2. ईद निमित्त तुमच्या मुस्लिम मित्रांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्या.